अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजता होणार आहे. याचवेळी कारखान्याने सन २०२४- २५ या गळीत हंगामात उत्पादित केलेल्या आठ लाख ७७७ व्या साखर पोत्यांचे पूजन रविवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या हस्ते होणार आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
अध्यक्ष ओहोळ यांनी सांगितले की, माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने नव्याने उभारलेल्या ५५०० मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पातून गेल्या तीन वर्षांपासून दहा लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त ऊस गाळप केले आहे. कारखान्याला देश पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. तर उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले की, विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पातून प्रतिदिन ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार लागणार आहे. विस्तारित डिस्टिलरी प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी वाफेद्वारे घट्ट केले जाईल. आधुनिक इन्सिनरेशन बॉयलरमध्ये जाळले जाऊन त्यातून पोटॅशियमयुक्त राख तयार केली जाते. ही राख अमृत शक्ती दाणेदार खतांमध्ये मिसळली जाऊन अधिक गुणवत्ता पूर्ण खतांची निर्मिती होईल.