सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण २५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १७ दुबार उमेदवारी अर्ज वगळता कारखान्याच्या २१ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. या दाखल अर्जांची आज, गुरुवारी छाननी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी ही माहिती दिली. सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्जांची छाननी होईल. छाननीसाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, वकिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक यांनी केले आहे.
बुधवारी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी इच्छुकांसह समर्थकांनी गर्दी केली होती. काल वसभरात १५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर एकूण २५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी १७ अर्ज दुबार आहेत. गटनिहाय दाखल अर्जांमध्ये कऱ्हाड गटात ११ (१८), तळबीड गटात २५ (२४), उंब्रज गटात २३ (३१), कोपर्डे हवेली गटात २८ (४९), मसूर गटात २८(४३), वाठार (किरोली) गटात १५ (३३), महिला राखीव प्रवर्गात नऊ (१४), अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात सहा (९), इतर मागास आणि भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून सात (१०) उमेदवारी अर्ज दाखल झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.