अहिल्यानगर : डॉ. बा. बा. तनपुरे साखर कारखान्याची २५ मे पूर्वी होणार निवडणूक

अहिल्यानगर : राहुरीतील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याची प्रक्रिया २५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने कारखान्याची निवडणूक घेण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदार यादीत सुमारे २१ हजाराहून अधिक सभासदांची नावे आहेत. मात्र, ही मतदार यादी केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी लावण्यात आली, याबद्दल कारखाना बचाव कृती समितीने मेळाव्यात संताप व्यक्त केला. मंगळवारी राहुरीत कारखाना बचाव कृती समितीने मेळावा घेतला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ताराचंद पाटील गाडे (बारागाव नांदूर) होते. समितीच्या न्यायालयीन संघर्षामुळेच कारखान्याचे अस्तित्व कायम राहिल्याचा दावा संयोजक अमृत धुमाळ यांनी केला.

समितीचे संयोजक अमृत धुमाळ, कामगार नेते भरत पेरणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांनी सांगितले की, मतदारयादी कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध करून द्यावी यासाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे मागणी करणार आहे. सभासदांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री कशी करणार. याउलट तनपुरे कारखान्याचे कार्यक्षेत्र राहुरी तालुक्यात असताना प्रारूप मतदार यादी मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी लावण्यात आली. यावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. मेळाव्याला कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर कोळसे, बाळासाहेब गाडे, लक्ष्मण गाडे, पंढरीनाथ पवार, सुखदेव मुसमाडे, गंगाधर तमनर, अजित कदम, विलास शिरसाठ आदीसह सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here