लाहोर : देशात सुमारे १० लाख टन साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये साखरेच्या किमती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. साखरेच्या किमती २०० रुपये प्रतीकिलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ बाजारात साखर १६५-१७० रुपये किलो दराने विकली जात आहे, तर घाऊक बाजारात ती १५९ रुपये किलो आहे. लाहोरमध्ये घाऊक साखरेचे दर १५९ रुपये प्रतीकिलो आहेत, तर किरकोळ बाजारात साखर १६५ ते १७० रुपये प्रतीकिलो दरम्यान विकली जात आहे. एका महिन्यापूर्वी १४०-१५० रुपये किलोने विक्री केली जात होती. त्यापेक्षा हे दर खूपच जास्त आहे. याबाबत, एक्सप्रेस ट्रिब्यूनशी बोलताना, किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष हाफिज आरिफ यांनी गेल्यावर्षी साखरेच्या ७,००,००० टन अत्यधिक निर्यातीमुळेच आता मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, आमचा सध्याचा साठा फक्त ५.८ दशलक्ष टन आहे, परंतु देशांतर्गत वापर वाढत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात केल्याने आपण असुरक्षित बनलो आहोत. या हंगामात उसाचा उतारा सुमारे १२ टक्यापर्यंत घसरला आहे आणि लागवडीखालील क्षेत्रदेखील २० टक्यांनी कमी झाले आहे. याचा अर्थ असा की एकूण साखर उत्पादनाचा अंदाज धोक्यात आला आहे. बाजारातील घटकांचा अंदाज आहे की साखरेचा किलोचा भाव लवकरच २०० रुपयांपर्यंत पोहोचेल. सध्या खुल्या बाजारात किंवा घाऊक विक्रेत्यांकडे साखरेचा साठा नाही, परंतु साखर कारखान्यांकडे तो आहे असे आरिफ म्हणाले.
सरकारकडील अधिकृत आकडेवारीनुसार २०२४-२५ साठी पाकिस्तानचे साखर उत्पादन ६.८ दशलक्ष टन असेल, जे मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्यांनी जास्त आहे. तथापि, अंदाजे वार्षिक वापर ६.६ दशलक्ष टन असल्याने, हे अतिरिक्त उत्पादन नगण्य आहे. साठेबाजी किंवा पुरवठा साखळीतील विलंब यांसारख्या किरकोळ व्यत्ययांमुळेदेखील पॅनिक खरेदी होऊ शकते असा इशारा उद्योगातील तज्ज्ञांनी दिला आहे. रमजानमध्ये साखरेचा वापर वाढतो. ही तूट कमी करण्यासाठी, सरकारने देशभरातील रमजान बाजारांमध्ये १३० रुपये प्रति किलो या दराने अनुदानित विक्रीसाठी १,००,००० टन साखर वाटप केली आहे.
पंजाब अन्न विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना महागाईपासून वाचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मात्र, हा उपक्रम अपुरा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अर्थतज्ज्ञ ओसामा सिद्दीकी म्हणाले की, रमजानमध्ये अनुदानित साखर मासिक मागणीच्या केवळ १० टक्के गरज भागवते. बहुतेक कुटुंबे अजूनही खुल्या बाजारांवर अवलंबून राहतील, जिथे किमती अनियंत्रित आहेत. गेल्यावर्षी, अशाच उपाययोजना करूनही पवित्र महिन्यात किमती २५ टक्क्यांनी वाढल्या होत्या.
पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (पंजाब झोन) च्या प्रवक्त्याने हे दावे फेटाळून लावले आणि सांगितले की साखरेच्या एक्स-मिल किमतीत असामान्य वाढ झालेली नाही. दरवाढ ही पुरवठा आणि मागणीनुसार कमी-अधिक होत असते, असे पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (पीएसएमए) च्या प्रवक्त्याने सांगितले. किरकोळ बाजारात कृत्रिम किमती वाढण्याचे खरे लाभार्थी सट्टेबाज माफिया, साठेबाज आणि नफेखोर आहेत. ते किंमतींमध्ये फेरफार करण्यासाठी अफवा पसरवून परिस्थितीचा फायदा घेतात असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, साखर कारखाने संघीय आणि प्रांतीय सरकारे, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रमजान पॅकेज डिस्काउंट स्टॉल्सद्वारे सर्व जिल्हे, तहसीलमध्ये १३० रुपये प्रति किलो अनुदानित दराने साखर पुरवत आहेत.
प्रवक्त्याने सांगितले की, चालू गळीत हंगामात उसाचे दर प्रती मन ६५० रुपये झाले आहेत. साखर उत्पादन खर्च वाढवणाऱ्या इतर घटकांमध्ये साखर उद्योगावरील वाढलेले कर, महागडी आयात केलेली रसायने आणि वाढत्या वेतनाचा समावेश आहे. हे एक सत्य आहे की जेव्हा कच्च्या मालाची किंमत वाढते, तेव्हा उद्योग टिकून राहण्यासाठी आणि उत्पादन खर्च वसूल करण्यासाठी अंतिम उत्पादनाची किंमत अखेर वाढेल. चालू गळीत हंगामात जागतिक तापमानवाढ आणि पिकांवर होणाऱ्या कीटकांच्या हल्ल्यामुळे उसाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या उन्हाळ्यात अती तापमानामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले. नंतर, जेव्हा शेतकऱ्यांना पिकाला खत घालण्याची गरज भासली, तेव्हा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्पादनावर वाईट परिणाम झाला.