नांदेड : नांदेड विभागात यंदाच्या गळीत हंगामात सहभागी झालेल्या २९ साखर कारखान्यानी आतापर्यंत ९४ लाख ११ हजार ३५८ टन उसाचे गाळप, तर ९० लाख आठ हजार ८५३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.५७ टक्के राहिला आहे. आतापर्यंत २९ पैकी १० साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने ही माहिती दिली. सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. तसा कारखान्यांचे गाळपही कमी होत आहे. यामुळे गाळप हंगाम आटोपत आला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस संपत आल्याने कारखाने बंद होण्याची गती वाढली आहे.
विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांनी यंदा १५ नोव्हेंबरपासून गाळप हंगामाला सुरुवात केली होती. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. आता बंद झालेल्या साखर कारखान्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, लातूर, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, ओकांर साखर कारखाना प्रा.लि., विलास सहकारी साखर कारखाना लि. निवळी, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुंड, रेणा सहकारी साखर कारखाना निवाडा, साईबाबा शुगर्स लि. शिवणी, जागृती शुगर ॲण्ड अलाइड तळेगाव, ट्वेंटीवन शुगर ॲण्ड अलाइड माळवटी तर परभणी जिल्ह्यातील श्री रेणुका शुगर लि. देवनांद्रा पाथरी या कारखान्यांचा समावेश आहे.