कोल्हापूर : दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, साखर उद्योगात आता सहकारातून खासगीकरण व त्यातूनही पुन्हा आता आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण असा प्रवास सुरू झाला आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात सहकारी व खासगी असे २०७ कारखाने सुरू होते. तर यंदा २०० कारखान्यांनी गळीतामध्ये सहभाग घेतला. मात्र, राज्यातील नऊ समूहांकडे यापैकी ५० कारखाने आहेत. हे कारखाने एकूण गाळपापैकी तब्बल २७ टक्के गाळप करतात. या समुहांकडे खासगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत.
या प्रमुख समुहांमध्ये अजितदादा ग्रुप, विठ्ठलराव शिंदे, बारामती ॲग्रो, लातूर देशमुख, पुणे ओंकार ग्रुप, लातूर देशमुख -२, राजारामबापू, भैरवनाथ समूह, सोनहिरा आणि अथणी समुहाचा समावेश आहे. या कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात २ कोटी ९० लाख मे. टन गाळप केले. मूळचे कारखाने सहकारी व नंतरचे मात्रखासगी असे चित्र समूहांमध्ये दिसते. साखर उद्योगात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हातपाय पसरले आहेत. सहकारी व खासगी उद्योग समूहातील एकत्रिकरणाचा वेग पाहता एकल कारखान्यांना भविष्यात तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.