अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत १ कोटी १० लाख टन टन उसाचे गाळप झाले आहे. इंडीकॉन डेव्हलपर्स (अंबालिका), बारामती ॲग्रो हळगावव आणि स्वामी समर्थ ॲग्रो नेवासा हे तीन कारखाने बंद झाले आहेत. दररोज ५३ हजार टन ऊस गाळप होत आहे. अहिल्यानगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या अहवालानुसार सध्या २६ साखर कारखान्याकडून उसाचे गाळप सुरु आहे. विभागात ९४ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. अहिल्यानगरचा सरासरी साखर उतारा ८.०६ तर नाशिकमध्ये ९.६२ टक्के साखर उतारा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक क्रांतीशुगर (पारनेर) चा ११.४३ साखर उतारा असून त्यापाठोपाठ अगस्ती कारखान्याचा साखर उतारा ११.१९, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा ११.०८ आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. अहिल्यागरला ९४ हजार ७५० टन तर नाशिकला ९ हजार टन अशी विभागात १ लाख ११ हजार ५०० टन गाळप क्षमता आहे. सध्या विभागात ५३ लाख टनापर्यंत प्रतिदिन ऊस गाळप होत असून ५६ ते ५७ हजार क्विंटलच्या जवळपास साखर उत्पादन होतेय. खासगी इंडिकॉन डेव्हलपर्स (अंबालिका) कारखान्याने सर्वाधिक १२ लाख ३५ हजार टनापेक्षा अधिक तर गंगामाई कारखान्याने ८ लाख ६२ हजाराच्या पुढे ऊस गाळप केले आहे. सहकारी साखर कारखान्यांमध्ये मारुतराव घुले कारखान्याने ८ लाख १० हजारच्या पुढे आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ७ लाख ५० हजाराच्या पुढे ऊस गाळप केला आहे.