पुणे : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीला सहकार विभागाकडून स्थगिती

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीला काही सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या पार्श्वभूमीवर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांनी माळेगावच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. अंतिम मतदार यादीबाबत मुंबई उच्च न्यायालयात योग्य तो निर्णय होईपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे, असा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांनी काढला. या निर्णयाविरुद्ध विरोधी आघाडीतील संचालकांनी नाराजी व्यक्त केली.

माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुणे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये १९,५४९ सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी निवडणुकीचे नियोजन केले. निवडणूक कार्यक्रम तयार करून तो मंजुरीसाठी पुणे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला होता. दरम्यान, विरोधी संचालक रंजन तावरे, कार्यकर्ते युवराज तावरे यांनी या निवडणूक स्थगितीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. माळेगावची अंतिम मतदार यादी १७ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर नियमानुसार १५ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित असते. परंतु सहकार विभागाने सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया गुरुवारी स्थगित केली. प्रादेशिक सहसंचालकांनी १४ फेब्रुवारीला सुरुवातीला दिलेला निकाल बरोबर होता. तो निकाल त्याच दिवशी शुद्धिपत्रक काढत त्यांनी बदलला आणि मतदार यादीवर वाद निर्माण झाला असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here