पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस शेती क्षेत्रामध्ये पाणी, खतांची बचत करून सुमारे ४० टक्क्यांपर्यंत ऊस उत्पादनवाढ, साखर उतारा वाढ शक्य आहे. ऊस शेतीत एआयचा वापर क्रांतिकारक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी यांच्यासह शनिवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ व बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या ऊस शेती प्रक्षेत्रास भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या तंत्रज्ञानाने ऊस घेतलेल्या राज्यातील काही शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सभागृहामध्ये झालेल्या परिसंवादात नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, शेती विभागाचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे तुषार जाधव, धीरज शिंदे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश नलवडे म्हणाले, क्रांतीकारक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवा. शेतकऱ्यांच्या मोबाइलवर मराठी भाषेत हे तंत्रज्ञान पोहचविले जात आहे. या पद्धतीने उसाचे एकरी १५० टन एवढे उत्पादन घेतले असून, आता एकरी २०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.