महाराष्ट्र : राज्यात 139 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त, 778.41 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

पुणे: राज्यात यंदाच्या हंगामात 9 मार्च 2025 अखेर गाळपात हंगामात सहभाग घेतलेल्या 200 साखर कारखान्यांपैकी 139 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी 826.87 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून 778.41 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.41 टक्के इतका आहे.

राज्यात कोल्हापूर विभागाने सर्वाधिक 11.05 टक्के साखर उतारा मिळवला आहे. विभागातील 40 कारखान्यांनी 201.06 लाख टन उसाचे गाळप केले असून, 222.24 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागातील 35 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. पुणे विभागातील 31 पैकी 20 कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहे. विभागात 194.47 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 185.04 लाख क्विंटल झाले आहे. साखर उतारा सरासरी 9.52 टक्के आहे.

सोलापूर विभागातील 45 पैकी 43 कारखाने बंद झाले आहेत. कारखान्यांनी आतापर्यंत 130.02 लाख टन उसाचे गाळप करून 105.37 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 8.1 टक्के आहे. अहिल्यानगर विभागात 26 पैकी 9 कारखाने बंद झाले आहेत. विभागातील कारखान्यांनी 8.82 टक्के साखर उताऱ्याने 110.82 लाख टन उसाचे गाळप करून 97.76 लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.छत्रपती संभाजीनगर विभागात 22 पैकी 14 कारखाने बंद झाले आहेत. कारखान्यांनी 7.98 टक्के साखर उताऱ्याने 79.81 लाख टन उसाचे गाळप करून 63.66 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

नांदेड विभागातील 29 पैकी 18 कारखाने बंद झाले असून त्यांनी 96.77 लाख टन उसाचे गाळप करून 93.18 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा साखर उतारा 9.63 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 4 कारखाने सुरु असून 10.69 लाख टन उसाचे गाळप करून 9.48 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा उतारा 8.87 टक्के इतका आहे. नागपूर विभागात 3 कारखान्यांनी 3.23 लाख टन उसाचे गाळप करून 1.68 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नागपूर विभागाचा राज्यात सर्वात कमी 5.2 टक्के इतका उतारा आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

‘एआय’च्या माध्यमातून ऊस शेतीत ४० टक्के उत्पादनवाढ शक्य : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

 

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here