अहिल्यानगर : सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने नव्याने विस्तारित झालेल्या इथेनॉल प्रकल्पातून दररोज ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. कारखान्यात बॉयलर वाफेवर १.८० मेगावॅट क्षमतेचा टर्बाइन चालू असून ताशी १८०० युनिट वीजनिर्मिती होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने उत्तुंग भरारी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष ओहोळ म्हणाले की, कारखान्याने ५५०० मेट्रिक टन क्षमतेच्या निर्मितीचा नवा कारखाना उभा केला. याचबरोबर ३० मेगावॅट वीजनिर्मितीही सुरू झाली. विस्तारित डिस्टिलरी प्रकल्पातून प्रतिदिन ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. याचबरोबर बाहेर पडणारे सांडपाणी वाफेद्वारे उकळून घट्ट केले जाणार आहे. अधिक गुणवत्तापूर्ण खतांची निर्मिती करण्यात येणार आहे. बॉयलरच्या वाफेवर १.८० मेगावॅट क्षमतेचा टर्बाईन चालून ताशी १८०० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. याच विजेचा वापर डिस्टिलरी प्रकल्पासाठी केला जाणार आहे. तर माजी मंत्री थोरात म्हणाले की, कारखान्याच्या चांगल्या कामामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिक मिळाले आहेत. कारखान्यामुळे शेतकरी सभासद व कामगार यांच्या जीवनात समृद्धी आली आहे.