कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या संचालकपदी चौगले, उलपे

कोल्हापूर :  कसबा बावडा येथील छत्रपती  राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या उत्पादक सभासद गट क्र. ५ कसबा बावडा या मतदारसंघातील रिक्त झालेल्या दोन जागांवर अनुक्रमे बाजीराव शामराव चौगले व धीरज दिलीप उलपे (दोघेही रा. कसबा बावडा) यांची मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड झाली. प्रादेशिक उपसंचालक (साखर) तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. मावळे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

कारखान्याच्या संचालक मंडळाची मे २०२३मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत गट क्रमांक ५ कसबा बावडामधून नारायण बाळकृष्ण चव्हाण व दिलीप यशवंत उलपे विजयी झाले होते. मात्र, नारायण चव्हाण यांचे १० ऑक्टोबर २०२४ रोजी, तर दिलीप उलपे यांचे ७ जानेवारी २०२५ रोजी रोजी निधन झाल्याने या गटातील दोन जागा रिक्त झाल्या होत्या.

या रिक्त जागांबाबत प्रादेशिक उपसंचालक (साखर) जी. जी. मावळे यांनी ३ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवारी दुपारी ३:०० ते सायंकाळी साडेचारपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविली. रिक्त झालेल्या दोन जागांसाठी अवघे दोन अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक  बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

या निवडीनंतर नूतन संचालकांचा जी. जी. मावळे व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंदा चौगले, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, संचालक दिलीप पाटील आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. या निवडीनंतर कारखानास्थळी व उमेदवार राहात असलेल्या परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

महत्त्वाच्या बातम्या:

२०२४-२५ साखर हंगामात देशात १३ राज्यांमध्ये उसाची थकबाकी १५,५०४ कोटी रुपये : केंद्रीय मंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया

 

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here