सांगली : सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी मार्चअखेर कर्जवसुली मोहीम जोरात सुरू केली आहे. शेतीसह बिगरशेती वसुलीचाही यात समावेश आहे. बिगरशेती संस्थांकडे एक हजार कोटींपेक्षा जास्त थकबाकी असून, त्यात बड्या नेत्यांशी संबंधित संस्थांचा समावेश आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील चार बड्या साखर कारखान्यांनी जिल्हा बँकेचे ५५० कोटी रुपयांची कर्जे थकवली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये केन अॅग्रो, वसंतदादा कारखाना, माणगंगा व महांकाली साखर कारखान्यांचा समावेश आहे.
खासदार विशाल पाटील यांच्या संबंधित वसंतदादा कारखाना, वसंतदादा एरिगेटर्स, स्वप्नपूर्ती साखर कारखाना व सह्याद्री मोटर्स संस्थांकडे तब्बल १९० कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत. भाजपचे नेते, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या केन अॅग्रो साखर कारखान्याकडे २५० कोटींची थकबाकी आहे. जिल्हा बँकेने सध्या बिगरशेती संस्था, व्यक्तीकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. एकूण ४ हजार ४८८ जणांवर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील चार कारखान्यांकडेच तब्बल ५५० कोटी थकबाकी आहे. कर्जवसुलीसाठी चारही कारखान्यांची मालमत्ता जिल्हा बँकेने ताब्यात घेतली आहे. त्यातील काहींचा लिलाव काढला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कारखान्यांवर कारवाईचा इशारा जिल्हा बँकेने दिला आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्याशी संबंधित संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी ‘एनसीएलटी’मध्ये दावा दाखल केल्यानंतर ६७ कोटी वसूल झाले आहेत. तर वसंतदादा दूध संघ व ‘स्वप्नपूर्ती’ कडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने ‘एनसीएलटी’कडे याचिका दाखल केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
सोलापूर : जिल्ह्यातील गळीत हंगामाची समाप्ती, साखर उत्पादनात तब्बल ४६ टक्के घट
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.