नांदेड : लातूरसह बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांनी यंदा नांदेड जिल्ह्यातून ऊस नेला आहे. चारशे ते पाचशे मे.टन ऊस परजिल्ह्यात गेला आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस जिल्ह्याबाहेर गेला आहे. यंदा सर्वच कारखान्यांनी २५०० ते २७०० रुपये भाव दिला आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत घेऊन जाण्याबरोबरच अधिकचा भाव देण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात कमी दरामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सभासद असलेल्या कारखान्यांना ऊस न देता परजिल्ह्यांतील कारखान्यांना ऊस देणे पसंत केले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांना गतवर्षीएवढेदेखील ऊस गाळप होणार नाही, असे चित्र आहे. गुळासाठी मात्र १८०० ते २००० रुपयेप्रमाणे ऊस नेण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात एक सहकारी आणि पाच खासगी असे एकूण सहा कारखाने आहेत. त्याचबरोबर गुन्हाळांची संख्याही मोठी आहे. गतवर्षीच्या हंगामाअखेर नांदेड जिल्ह्यात १९ लाख ४७ हजार २३६ मे. टन ऊसाचे गाळप सहा कारखान्यांनी केले होते. यामध्ये सर्वाधिक ५ लाख ४२ हजार ३०४ मे. टन ऊस गाळप श्री सुभाष शुगर हदगावने केले होते. त्यापाठोपाठ भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने ४ लाख ७५ हजार ६१९ मे.टन गाळप केले होते. आजघडीला जिल्ह्यात १७ लाख ३६ हजार ६६८ मे.टन गाळप झाले आहे. यामध्ये श्री सुभाष शुगरचे जवळपास साडेचार लाख मे.टन तर भाऊराव कारखान्याचे साडेतीन लाख मे. टन गाळप झाले आहे. मागील हंगामात २ लाख १६ हजार ४३६ गाळप करणाऱ्या व्टेंटी वन शुगर, शिवणीने यंदा फेब्रुवारीमध्येच २ लाख ८० हजार १५३ मे. टन ऊस गाळप केले आहे. ऊस वेळेत जात असल्याने शेतकऱ्यांनी कारखाना कोणता हे पाहिले नाही. त्यामुळे मेपर्यंत चालणारा हंगाम मार्चअखेर बंद होईल, असा अंदाज आहे.