वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाची नुकताच समाप्ती झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी उत्पन्न मिळाले आहे. जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऊसतोडणी सुरू झाली. एकूण ५० हजार टनाच्या आसपास ऊस उत्पादन झाले असून जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ४५ टन ऊस उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी ११६० हेक्टर क्षेत्रात ५२ हजार टन ऊस उत्पादन झाले होते. बहुतांश ऊस डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला गाळपासाठी गेला तर काही राधानगरी येथेही नेण्यात आला.
जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. याशिवाय मालवण, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात काही प्रमाणात ऊसशेती आहे. साधारणतः ११०० हेक्टरवर ऊस लागवड आहे. यंदा करूळ घाट बंद असल्यामुळे भुईबावडा घाटमार्गे ऊस वाहतूक करण्यात आली. फेब्रुवारीनंतर ऊस तोडणी गतीने झाली. त्यामुळे ६ मार्च रोजी जिल्ह्यातील ऊस तोडणी पूर्ण झाली. यावर्षी कारखान्याने प्रतिटन ३,१५० रूपये दर जाहीर केला आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र घटून १७०० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या काही वर्षात ऊस तोडणीच्या समस्येने जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेतीला रामराम केला.