पुणे : मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्ण तापमान व पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या विविध वाढीच्या अवस्थेवर परिणाम होतो. या कालावधीत सरीत पाचट पसरून त्यावर प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट आणि १ लिटर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूचा वापर करावा पाण्याच्या दोन पाळीतील अंतर २० दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सल्ला आर. एन. गायकवाड, डॉ. ए. डी. कडलग यांनी ‘अग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून दिला आहे. लेखात म्हटले आहे कि, फेब्रुवारी ते जून या कालावधीत पाण्याचा ताण पडून उत्पादनामध्ये घट दिसून येते. ताज्या उसात वजनाच्या ७० टक्के वजन पाण्याचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियेमुळे उसामध्ये साखर तयार होते. साखर हा पदार्थ कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयुगाने बनतो. यातील हायड्रोजन केवळ पाण्यातून मिळतो. त्यामुळे पाणी नसेल तर हायड्रोजन मिळणार नाही. साखर निर्मिती होणार नाही.
मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्ण तापमान व पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या विविध वाढीच्या अवस्थांवर परिणाम होतो. या कालावधीत तापमानात वाढ झाल्यामुळे पिकातील ओलाव्यात घट होते. या कालावधीत दिवसा व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होऊन रात्रीचे तापमान वाढलेले असते. जमिनीतील उपलब्ध पाणी कमी होऊन मुळाच्या जवळील तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी, मुळाद्वारे पाणी व अन्नद्रव्याच्या शोषणात घट होते. उसाच्या पानावरील पर्णरंगद्वारे होणारे बाष्पीभवन कमालीचे वाढते. आडसाली उसाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो, कारण ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत असतो.
बाष्पीभवन पात्राचा वापर करून एकूण ७५ मिमी बाष्पीभवन झाल्यावर पिकास पाणी द्यावे. समपातळीत सऱ्या पाडाव्यात. लागण व मोठी बांधणी मिळून हेक्टरी पाच ते सात टन गांडूळ खताचा वापर करावा. पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवण्यासाठी टेसीओमीटरचा वापर करावा, त्यामुळे प्रति हेक्टरी पाणी कमी लागते. पिकास पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत पाण्याचे पाळीतील अंतर दोन-तीन दिवसांनी वाढवत जावे. त्यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. पिकाची मुळे अधिक खोलवर जाऊन खालच्या थरातील उपलब्ध पाण्याचा वापर करतात. जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास घटेल तेव्हाच पाणी द्यावे. पालाश खताची मात्रा (६० किलो प्रति हेक्टर) लागणीच्या वेळी जमिनीतून द्यावी. लागण करताना बेणे म्युरेट ऑफ पोटॅशचे २ टक्के द्रावण किंवा ४ टक्के मग्नेशियम सल्फेट किवा ४ टक्के (हिराकस) फेरस सल्फेट मध्ये पाच मिनिट बुडवून त्यानंतर लागण करावी.
युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी), म्युरेट ऑफ पोटॅश २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात संयुक्त द्रावणाची फवारणी पिकावर लागणीनंतर ६०, १२० व १८० दिवसांनी करावी. लागणीचे बेणे शिळे झाल्यास चुनखडीचे पूर्ण विद्राव्य स्वरूपातील २ टक्के द्रावण तयार करून त्यात बेणे २ तास बुडवून नंतर लागण करावी. पाचट सरीत पसरून त्यावर प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट आणि १ लिटर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूचा वापर करावा. पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर २० दिवसापेक्षा जास्त वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाऱ्यापासून संरक्षण म्हणून शेताच्या पश्चिमेस व उत्तरेस शेवरी लावावी, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित होतो.
खताचा वापर करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. खोडव्यामध्ये पाचटाचे आच्छादन करावे, त्यावर एकरी ५० किलो युरिया, ८० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २ लिटर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा. सुरु व खोडवा उसामध्ये तापमान वाढ झाल्यामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सुरू व खोडवा उसाला फूट कमी होऊन गाळप योग्य उसांची संख्या कमी मिळते, परिणामी उत्पादनामध्ये घट येते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.