छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांत यंदा २२ कारखान्यांनी आतापर्यंत ऊस गाळप हंगामात सहभाग घेतला होता. हा हंगाम आता अंतिम टप्प्यात आले. या पाच जिल्ह्यांतील १४ कारखान्यांचे गळीत आता आटोपले आहे. तर आठ कारखान्यांचे गाळप मंगळवारपर्यंत सुरूच होते. ऊस तोडणी मजुरांबरोबरच हार्वेस्टरच्या साह्याने ऊस तोडला जात असल्याने झपाट्याने गाळप आटोपत असल्याची स्थिती आहे. सर्व बावीस कारखान्यांनी मंगळवारपर्यंत (ता. ११) ७९ लाख ९८ हजार ९० टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९८ टक्के साखर उताऱ्याने ६३ लाख ८४ हजार ९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
गाळप समाप्त झालेल्या कारखान्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील पाच, नंदुरबारमधील दोन, बीडमधील सहा, जळगावमधील एका कारखान्याचा समावेश आहे. तर जालन्यातील चार, बीडमधील दोन व छत्रपती संभाजीनगरमधील दोन कारखाने सुरू आहेत. गाळपासाठी उपलब्ध असलेला ऊस व साखरेचा उतारा लक्षात घेता साखरेचे अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता नाही. मशीनद्वारे ऊस तोडणीवर कारखान्यांनी भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही गाळप लवकरात लवकर आटोपेल अशी शक्यता असल्याचे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.