सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून एकूण १६ साखर कारखान्यांनी ८८ लाख १८ हजार ६५९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८५ लाख १४ हजार ५९५ क्विंटल इतके साखर उत्पादन घेतले आहे. यंदाच्या हंगामात, जिल्ह्यात खासगी साखर कारखान्यांच्या तुलनेत सहकारी साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यात बाजी मारली आहे. सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी उतारा ११.३६ टक्के असून खासगी कारखान्यांचा सरासरी उतारा ८.०६ टक्के आहे. यामुळे सहकारी साखर कारखान्यांना ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना जादा दर मिळण्याची आशा आहे. आतापर्यंत ८ कारखान्यांचा साखर हंगाम संपुष्टात आला आहे. रयत अथणी साखर कारखाना साखर उताऱ्यात प्रथम क्रमांकावर असून या कारखान्याचा उतारा १२.०८ टक्के आहे. सर्वात कमी ५.१४ टक्के उतारा दत्त इंडिया साखर कारखान्याचा आहे.
जिल्ह्यात सहकारी तर ९ खाजगी असे एकूण १७ साखर कारखाने आहेत. हंगामात ऊस गाळपाच्याबाबत खासगी साखर कारखाने आघाडीवर असून खासगी कारखान्यांनी ४५ लाख ६१ हजार २०१ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी एकूण ४२ लाख ५७ हजार ४५८ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने ऊस गाळपासह साखर निर्मितीत आघाडी घेतली असून १३ लाख ४० हजार ५०० मे. टन गाळप करून ११ लाख ३४ हजार ९०० क्विटल इतकी सर्वाधिक साखर निर्मिती केली आहे. या कारखान्याचा साखर उतारा ८.३९ टक्के आहे. कृष्णा कारखान्याने ११,५०,८८५ मे. टन ऊस गाळप करून १३,११,९६० क्विंटल, किसन वीर भुईंज कारखान्याने ३ लाख ९२ हजार ९०४ मे. टन गाळप व ४ लाख १९ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.