पुणे : निरा – भीमा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेच वर्चस्व

पुणे : शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले. कारखान्याची सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठीची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. ही सलग ५ वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या, गेल्या २५ वर्षांत सर्वच निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहायक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.

गुरुवारी, दि. १३ रोजी निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे : प्रतापराव पाटील, उमेश अच्युतराव, प्रकाश मोहिते, संजय बोडके, विजय घोगरे, महेशकुमार शिर्के, दादासाहेब घोगरे, सुभाष गायकवाड, लालासाहेब पवार, राजकुमार जाधव, विलास वाघमोडे, आनंदराव बोंद्रे, राजेंद्र देवकर, दत्तू सवासे, राहुल कांबळे, कृष्णाजी यादव, रामचंद्र नाईक, भाग्यश्री पाटील, संगीता पोळ, कल्पना शिंदे.

हर्षवर्धन पाटील यांनी मानले सर्वांचे आभार

निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. सध्या देशातील व राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील ४६ गावांमधील सभासद, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी १९९९ मध्ये निरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here