पुणे : बारामतीत ‘एआय’च्या मदतीने पिकवला एकरी १०४ ते १५० टनांपर्यंत उत्पादन, तंत्रज्ञानाची कमाल

पुणे : बारामतीच्या अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर पहिल्या टप्प्यातील विविध वाणांच्या तीन प्लॉटवरील ऊस तोडणी पूर्ण झाली आहे. त्यातून एकरी १०४ ते १५० टनांपर्यंतचे उत्पादन मिळाले आहे. बारामतीच्या अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॅाफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रयोग राबवला. गेल्या वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आणि पारंपरिक शेती पद्धतीने ऊस लागवड केलेला असे दोन स्वतंत्र प्लॉट तयार केले होते. त्याच्या तोडणीतून आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत.

कृषी विज्ञान केंद्रात सीओ ८६०३२, सीओ एम २६५, एमएस १०००१, पीडीएन १५०१२, सीओ व्हिएसआय ८००५ आणि सीओ व्हिएसआय १८१२१ या सहा प्रकारच्या ऊस वाणांची लागवड या ठिकाणी करण्यात आली. त्यापैकी सीओ एम २६५, पीडीएन १५०१२ आणि सीओ व्हिएसआय ८००५ या तीन वाणांची तोडणी पूर्ण झाली. त्यातून ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) प्रभावी वापर झाल्याचे दिसले आहे. या ठिकाणी ऊस उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, शिवाय खर्च आणि पाण्यातही सुमारे ३० टक्क्यांची बचत झाली आहे. कोएम २६५ या वाणाचे एकरी उत्पादन १५०.१० टन मिळाले आहे. तर पीडीएन १५०१२ या वाणाचे १२०.४० टन आणि सीओ व्हिएसआय ८००५ या वाणाचे १०४.७८ टन उत्पादन मिळाले आहे. ही उत्पादकता वाढ जवळपास ४० टक्क्यांहून अधिक आहे. आता येत्या पंधरवड्यात उर्वरित तीन प्लॉटवरील ऊसतोडणी पूर्ण केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here