पुणे : ऊस उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे (एआय) क्रांती होणार आहे. हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचावे यासाठी वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटसोबतच बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) जोमाने काम करीत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली केव्हीकेद्वारे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी आश्चर्यकारक एआय ऊस शेती राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. बारामतीमध्ये अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यस्थळावर प्रकल्पस्थळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र ऊस उत्पादकतेत पिछाडीवर आहे. त्यामागे जमिनीची कमी सुपीकता, अयोग्य व्यवस्थापन पद्धती, गुणवत्तापूर्ण बेण्याची कमतरता, खत व पाण्याचा असंतुलित वापर, वातावरण बदल, कीड व रोगांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव, अयोग्य वेळी तोडणीमध्ये घटणारे वजन अशी अनेक कारणे दिसतात. या समस्यांवर मात करण्याच्या उद्देशाने ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यासंदर्भात बारामती कृषी विज्ञान केंद्रात आश्चर्यकारक काम झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झाला, तर त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील.