करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, आज सोमवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अखेरच्या दिवशी आजी-माजी आमदार व दिग्गज नेतेमंडळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजय शिंदे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, प्रा. रामदास झोळ यांच्यासह आदिनाथ व मकाईचे आजी-माजी संचालक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. कारखाना निवडणुकीसाठी आतापर्यंत ३० अर्ज दाखल झाले आहेत.
आदिनाथ कारखाना बंद असून, बंद पडलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी निवडणूक बिनविरोध करावा, अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली होती. मात्र, त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजप प्रदेशाध्यक्ष रश्मी बागल यांनी कार्यकर्त्यांना कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत. कारखान्याच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. १० मार्चपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत ३० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इच्छुकांची संख्या पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होत आहे. कारखान्यावर २००६ पासून बागल गटाची सत्ता आहे. या निवडणुकीत बागल कुटुंबातील कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याचीही उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: सातारा : ६ लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन करून ‘अजिंक्यतारा’च्या गळीत हंगामाची सांगता
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.