श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न : रामराजे नाईक-निंबाळकर

राजाळे : श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमून कारखान्याचे वाटोळे करायचे आणि कारखान्याचे एकदा वाटोळे झाले, की हा ऊस तिकडे न्यायचा, असा प्रयत्न विरोधकांचा आहे. जर श्रीराम आणि साखरवाडीचा कारखाना चुकून बंद पडला, तर कुणाचा फायदा होईल? याचा विचार फलटण तालुक्यातील जनतेने करावा, अशी टीका आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. राजाळेतील जाधववस्तीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. माजी सरपंच संभाजी निंबाळकर, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक सुखदेव बेलदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजाळे सोसायटीचे संचालक सदाशिव जाधव, मारुती जाधव, माजी उपाध्यक्ष मारुती जाधव, माजी सरपंच ज्ञानदेव जाधव, शुभम जाधव, सुदीप जाधव, उमेश जाधव, महादेव जाधव, सुभाष गोडसे व तरुणांनी राजे गटात प्रवेश केला.
आमदार रामराजे म्हणाले की, श्रीराम कारखान्याविरोधात बोलणारे राजाळे येथील पुढारी स्वतःचा ऊस कुठे घालतात, हे त्यांनी सांगावे. त्यांनी निवडणुकीत उभे राहून दाखवावे. नीरा देवघरसाठी डोंगरात मी फिरलो. धरण मी बांधले आणि आता कालव्याचे काम होत आल्यावर ते सगळे त्यांनी केले, असं सांगत आहेत. धरणच जर झाले नसते तर कालवा झाला असता का ? ते आपल्या सर्वांच्या हक्काचे पाणी सांगोल्याला द्यायला निघाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ३६ गावांचे पाणी कमी होऊन त्याचा परिणाम उसाच्या क्षेत्रावर आणि इथल्या कारखान्यांवर होणार आहे, अशी भीती निबांळकर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here