सांगली : गाळप हंगामात जेव्हा उसाचे उत्पादन घटते, तेव्हा साखरेचा उतारा वाढतो. मात्र असे असताना यंदा ऊस उत्पादनात घट दिसून आल्यावर साखर उताराही घटल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी तयार झालेली साखर हिशेबात धरली नसावी. कारखानदारांनी उताऱ्यात मुद्दाम घट दाखवून उताऱ्याची चोरी केली आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याविरोधातही संघटना आवाज उठविणार आहे असे ते म्हणाले. राज्य सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे, हा शेतकऱ्यांचा विजय आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. राज्यात अद्याप ६ ते ७ हजार कोटींची एफआरपी थकीत असल्याचे ते म्हणाले.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, गेल्यावर्षीची अतीवृष्टी आणि पुरामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. तरीही साखर उतारा घटल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी उताऱ्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे. तयार झालेली साखर हिशेबात दाखवलेली नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला. दरम्यान, केंद्र सरकारने एकरकमी एफआरपीबाबत तयार केलेला कायदा राज्य सरकारला बदलता येत नाही. परंतु तत्कालीन महाविकास आघाडीने कायद्यात बदल केला होता. एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. तीन वर्षांची ही लढाई जिंकून कारखानदारांना चारीमुंड्या चित करण्यात उस उत्पादक शेतकऱ्यांना यश आले आहे असे शेट्टी यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांतर्फे मी दाखल केलेल्या याचिकेचे अॅड. योगेश पांडे यांनी उच्च न्यायालयात कामकाज पाहिले, त्यामध्ये यश आले असे शेट्टी यांनी सांगितले.