कोल्हापूर : यंदाचा २०२४- २५ चा साखर हंगाम अगदी सुरुवातीपासूनच ऊस उपलब्धता आणि अपेक्षित साखर उत्पादनाच्या सतत बदलत गेलेल्या आकडेवारीच्या गर्तेत अडकलेला होता. साखर उत्पादनाची संभ्रमावस्था आजअखेर देखील टिकून आहे. हवमानातील बदल, पिकावरील रोगाचा फैलाव यामुळे अपेक्षेनुसार सध्या ऊस व साखर उत्पादनात घट होत आहे. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ लाख टन, महाराष्ट्रात तब्बल २३ लाख तर कर्नाटकात १० लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. गेल्या वर्षी १५ मार्चअखेर २८२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते २३७ लाख टनांपर्यंत घसरले आहे. उत्तर प्रदेश वगळता येथून पुढील हंगामात साखरेचे उत्पादन गतीने वाढेल, अशी शक्यता नाही.
अग्रोवनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, यंदा ऊस व साखर उत्पादनात देशाची पिछेहाट स्पष्ट दिसत आहे. देशाचा पूर्ण हंगाम मार्चअखेर लवकर संपण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात ०२३८ या उसावर आलेला रेड रॉट’ आणि ‘टॉप शूट बोरर’ या रोगाचा फैलाव, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत अकाली फुलोरा व त्यामुळे खुंटलेली वाढ, साखर उताऱ्यावरील प्रतिकूल परिणाम या ऊस हंगामावर झाला आहे. याचा विपरीत आर्थिक परिणाम कारखान्यांवर होणार असल्याच्या बाबीला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानेही याला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात २०० साखर साखर कारखान्यांसह हंगाम सरासरी फक्त ८३ दिवसच चालला आहे. त्यातून केवळ ८० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण साखर उद्योग यंदाच्या वर्षी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेला आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तर पुढील वर्षी उभ्या उसाच्या वाढीला आणि साखर उत्पादनाला चालना मिळेल असे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.