सातारा : शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देणारा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सक्षम झाल्याने भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कारखान्याच्या २०२४- २५ च्या गळीत हंगामाची सांगता प्रसंगी ११ साखर पोत्यांच्या पूजनावेळी ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आदींसह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “योग्य नियोजनामुळे कारखान्याने १०८ दिवसांत १२.६७ टक्के एवढ्या उच्चतम साखर उताऱ्याने सहा लाख २५ हजार ५२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. उच्चतम दर देत गाळपाच्या उसाची वेळेत रक्कम देणारा कारखाना म्हणून अजिंक्यताऱ्याचा नावलौकिक आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये सर्व घटकांचा वाटा आहे. यावेळी कारखान्याचे आजी, माजी संचालक, अजिंक्य उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार शेतकरी उपस्थित होते.