रेणापूर : स्थापनेपासून दरवेळी बिनविरोध होणाऱ्या रेणा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. सोमवारपासून (ता. १७) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी (ता. २१) दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे. २० एप्रिलला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान, तर ता. २२ एप्रिलला सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे हे कामकाज पाहत आहेत. सन २००२ मध्ये निवाडा येथे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणा कारखान्याची उभारणी झाली. तेव्हापासून कारखान्याने बिनविरोध निवडणुकीची परंपरा टिकवली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीविषयी उत्सुकता आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार, दाखल झालेल्या अर्जांची छाननी २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लातूर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होणार आहे. पात्र उमेदवारांची नावे २५ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तर उमेदवारी मागे घेण्यासाठी ८ एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ आहे. नऊ एप्रिलला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम सूची प्रसिद्ध होईल. कारखान्याने आजपर्यंत राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत.