सातारा : जिल्ह्यातील १७ पैकी अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगामाची समाप्ती करूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले दिलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे. संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोन्या साबळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
याबाबत प्रकाश साबळे यांनी दिलेल्या संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखाना, अथणी शुगर शेवाळेवाडी, ग्रीन पॉवर गोपूज, स्वराज पडळ, श्री दत्त इंडिया, शिवनेरी, किसन वीर आदी साखर कारखान्यांनी उसाचे दर जाहीर केले. मात्र जाहीर दराप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांशी संबंधित सत्ताधारी उसाला हमीभाव देण्याची इच्छा व्यक्त करतात. पण तसे होत नाही. त्यामुळे अशा कारखान्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा साबळे यांनी दिला.