पुणे : यशवंत सहकारी साखर कारखाना जमीन विक्री प्रस्ताव संचालक मंडळाने गेल्या महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाजवी मतदान करून मंजूर केला होता. या प्रस्तावाला शेतकरी कृती समितीने विरोध दर्शवला होता. या समितीतील उरुळी कांचन येथील शेतकरी कृती समितीचे सदस्य अलंकार कांचन, विकास लवांडे, लोकेश कानकाटे, राजेंद्र चौधरी यांनी यशवंत जमीन विक्रीच्या निर्णय प्रस्तावाला स्थगिती देऊन मनमानी कारभाराची चौकशी करावी, असे निवेदन साखर आयुक्तांकडे दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मागील १४ वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या साखर कारखान्यावर मागील काही महिन्यांपासून संचालक मंडळ कार्यरत आहे. कारखान्याच्या मालकीची थेऊर येथील ९९.२७ एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना विक्री करण्याच्या मनमानी निर्णयाला आमचा विरोध असून, त्या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी. कारखान्याच्या रयत व सर्व सेवा संस्थेकडून कारखान्याला जवळ पास १३-१४ कोटी रुपये येणे आहे. ते येणे संचालक मंडळाने वसूल करण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसत आहे. हे अनेक लेखा परीक्षण अहवालात व कलम ८३ च्या चौकशी अहवालात स्पष्ट झालेले आहे. जर कारखान्याला विविध प्रकारची २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणी असतील, तर त्याबाबत काहीच कार्यवाही न करता केवल कारखान्याची मालकीची राज्य सह. बँकेच्या ताब्यात असलेली जमीन मनमानी पद्धतीने विक्रीस दोन दिवसांत स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.