पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या तीन- चार दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कारखान्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उमेदवारी मिळवणे हे अनेकांसमोर आव्हान असेल. अनेक इच्छुक आपण नेत्यांच्या किती जवळ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीकडे मतदार सभासदांचे देखील लक्ष लागले आहे. कोणत्या गावातून, कोणत्या पॅनेलमधून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध, दुरंगी की तिरंगी होणार याची चर्चा सुरू आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून पाच वर्षे झाली आहेत. संचालक मंडळाने मागील निवडणूक झाल्यापासून आता अकराव्या वर्षात पदार्पण केले आहे. यापूर्वी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक २५ एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. नंतरच्या काळात संचालक मंडळाच्या निवडणुकीचा विषय न्यायप्रविष्ट झाल्याने संचालक मंडळाला पाच वर्षांचा कार्यकाल वाढवून मिळाला आहे. आता निवडणूक लवकरच जाहीर होत असल्याने वाट पाहत असलेल्या संचालक इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी कारखाना तसेच इतर सहकारी संस्थांतून थकबाकी नसल्याचे दाखले घेण्यास सुरुवात केली आहे.