सांगली : जिल्ह्यात साखर उत्पादनात १९ लाख क्विंटलची घट, ऊस बिलाअभावी शेतकऱ्यांची कोंडी

सांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ७७,०६,३६४ टन उसाचे गाळप करून ८१,४६,५४० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. पण, २०२३-२४च्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा १८,९५,३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. एवढेच नव्हे तर साखर कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यातही ०.६६ टक्के घट झाली आहे. गेल्यावर्षी, २०२३-२४ मध्ये साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के होता. यामध्ये घट होऊन तो यंदा २०२४-२५ च्या गळीत हंगामात १०.४६ टक्के राहिला. साखर उतारा घटल्यामुळे त्यांचा परिणाम एफआरपी निश्चित करण्यावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

दरम्यान, साखर कारखान्यांनी ऊस बिले दिली नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्यावर्षी ८८,८३,२४५ टन उसाचे गाळप करून १,००,४१,८८६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के होता. यंदा उसाची उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याचा कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला. सर्वच कारखान्यांचा हंगाम संपला. पण कारखान्यांनी एक फेब्रुवारीनंतरची बिले दिलेली नाहीत. ही रक्कम ४०० ते ५०० कोटींहून जास्त असण्याची शक्यता आहे. बिले न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोसायट्यांचे कर्ज थकबाकीत जाणार असल्याची भीती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी व्यक्त केली. यास साखर कारखानदार जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here