कोल्हापूर : राज्यातील शेतकरी नोव्हेंबरपासून फेब्रुवारीअखेर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवतात. या पिकासाठी ठिबक सिंचन गरजेचे आहे. तसेच पाचटाचे आच्छादन महत्त्वाचे आहे. खोडवा ऊस पिकासाठी ठिबक सिंचन वापरल्याने आवश्यकतेप्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी देता येते. ५० ते ५५ टक्के पाण्याची बचत होते. उपलब्ध पाण्यात ठिबकद्वारे दुप्पट क्षेत्र सिंचित करणे शक्य होते. पिकाच्या मुळाच्या कक्षेतील ओलावा आणि हवा त्यांचे संतुलित प्रमाण पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने ऊस उत्पादन ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मदत होते, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
याबाबत ‘अग्रोवन’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, नेटाफिम इरिगेशन इंडियाचे कृषी विद्या विभागप्रमुख अरुण देखमुख यांनी म्हटले आहे की, १२ महिन्यांचे खोडवा पीक साधारणपणे १ टन ऊस निर्माण करण्यासाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेते. म्हणजेच हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १५० किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करणे जरुरीचे आहे. खोडव्याच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत मुळांशी अपेक्षित पाणी, अन्नद्रव्य आणि हवा याचे संतुलित प्रमाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. खोडव्याला अति पाणी हे ऊस, साखरेचे उत्पादन घटवते, तर सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण उत्पादन वाढविते. पिकाला नत्र, पालाशसाठी अनुक्रमे युरिया आणि पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आणि स्फुरदासाठी फॉस्फोरिक आम्ल किंवा मोनो अमोनियम फॉस्फेटचा वापर ठिबकद्वारे मुळाच्या कार्यक्षेत्रात केल्याने खतांच्या मात्रेत ३० टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तण नियंत्रणावरील खर्च वाचतो. मुळाच्या कक्षेतील ओलावा आणि हवा यांचे संतुलित प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने ऊस उत्पादन ३० ते ३५ टक्यांनी वाढते.