अहिल्यानगर : प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाची सांगता आज (ता.२) होत आहे. यंदा कारखान्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ पार पडेल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे यांनी दिली. ते म्हणाले की, कारखाना कार्यस्थळावरील धनंजयराव गाडगीळ सभागृहात सांगता सोहळा संपन्न होईल. कारखान्याने ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांचे हित जोपासले. सहकारी साखर कारखानदारी टिकून राहावी, याकडे लक्ष दिले. विविध अडचणींवर मात करुन सर्व गळीत हंगाम यशस्वी केले.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात उसाला सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून डॉ. विखे पाटील कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. यंदाचे वर्ष हे अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि विखे पाटील सहकारी साखर कारखाना अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के- पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे- पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे- पाटील, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे-पाटील, ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदकुमार राठी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा गीता थेटे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, उपाध्यक्ष सुनील जाधव आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी या सांगता समारंभास उपस्थित राहणार आहेत.