अहिल्यानगर : मे महिन्यात होणाऱ्या थोरात आणि विखे कारखान्याच्या निवडणुकीमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुन्हा आमने-सामने येणार आहेत. याचबरोबर राहुरीच्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने विखे, कर्डिले आणि तनपुरे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. संगमनेर कारखान्यावर थोरात यांचे तर विखे कारखान्यावर विखे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी दोन्ही विरोधी गटाने मोठी राजकीय फिल्डिंग लावल्याचे बोलले जाते.
विखे आणि थोरात यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे भवितव्य असेल. विखे कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील अरूण कडू यांच्यासह थोरात गट विखे कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे विखे कारखान्यातही विखे- थोरात संघर्ष अटळ ठरणार आहे. विखे समर्थक आमदार खताळ यांनी संगमनेर कारखान्याची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने संगमनेरला कारखाना निवडणुकीत विखे-थोरात संघर्ष पुन्हा टोकाची परिसिमा गाठेल, अशी शक्यता आहे.
या संघर्षाला गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा संदर्भ आहे. विखे गटाच्या ताब्यात गणेश कारखान्याची सत्ता होती. मात्र, थोरातांनी भाजपच्या विवेक कोल्हे यांच्या साथीने विखे गटाला या कारखान्याच्या सत्तेवरून पायउतार केले. थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांना राजकीय ताकद दिल्याने डॉ. सुजय विखे यांना तेथे पराभव स्वीकारावा लागला. परिणामी डॉ. सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये अमोल खताळ यांना पाठबळ देत थोरात यांचा पराभव केला. राहुरी कारखान्याचीही निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. विखे-कर्डिले आणि तनपुरे अशी दुरंगी लढत अपेक्षित असताना तिरंगी चित्र होऊ शकेल, अशी चर्चा आहे. अरुण कडू, अमृत धुमाळ, राजू शेटे हे नेतेही कारखान्याच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.