पुणे : केंद्र शासनाने रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरास चालना देण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले असून जैविक खतांचा वापर शेतकऱ्यांनी करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारतीय कृषी संशोधन परिषद (आईसीएआर) संस्थेला संलग्न असलेल्या कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (एटारी) यांना विविध पिकासाठी जैविक खतांचा वापर अवलंबण्यासाठीच्या पद्धतीचे वेळापत्रक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने ३ एप्रिल रोजी एटारी यांनी कृषी विज्ञान केंद्रा (केव्हीके) मार्फत फर्मंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अर्थात ‘किण्वित जैविक खत (एफओएम) आणि द्रव किण्वित जैविक खत (एलएफओएम)’ च्या प्रसारासाठी जागरूकता आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली.
या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि गुजरातमधील कृषी विज्ञान केंद्रांचे २५ शास्त्रज्ञ, सीबीजी प्लांट प्रतिनिधी आणि प्रगत शेतकरी सहभागी झाले. सदर कार्यशाळेमध्ये नॅचरल शुगरचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी सहभाग नोंदवून उपस्थित शास्त्रज्ञांना नॅचरल शुगर (रांजणी) कारखान्यात ऊसाची मळी आणि नेपियर गवत यापासून कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सीबीजी) प्लांटमधील अवशिष्ट पदार्थांपासून किण्वित जैविक खत तयार करण्याची पद्धती तसेच कारखान्याच्या प्रक्षेत्रावर ऊस पिकामध्ये एफओएम आणि एलएफओएमचा वापर करण्यासाठी अवलंबलेली पद्धती व त्याचे झालेले फायदे बाबत माहिती दिली.
नॅचरल शुगरचे सभासद शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सदर चर्चा सत्रामध्ये भाग घेऊन नॅचरल शुगर उत्पादित एफओएम, नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर चा वापर केल्यामुळे झालेले फायदे बाबत शास्त्रज्ञांना माहिती दिली. या चर्चासत्रामध्ये आयसीएआर-एटारीचे संचालक डॉ. सुब्रत कुमार रॉय यांनी रासायनिक खतांचा अवलंब कमी करून जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे, असल्याचे सांगितले. तसेच शास्त्रज्ञांना त्यांच्या अधिनस्त कृषी विज्ञान केंद्रांच्या प्रक्षेत्रावर एफओएम आणि एलएफओएम या खतांचे प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या यावेळी डॉ. व्यंकट मायंदे (माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला), आयसीएआर-एटारीचे माजी संचालक डॉ. लाखन सिंग, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. एस. माने आदीसह शास्त्रज्ञ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.