सांगली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून (एआय) कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात शेतीमध्ये समूह प्रकल्प राबवण्यात येणार आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहयोगाने जिल्ह्यातील ऊस आणि द्राक्ष शेतीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. शेतीचे उत्पन्न वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या हेतूने शेतात एआयचा वापर केला जात आहे. एआयच्या वापरामुळे उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे. प्रारंभी जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि वाळवा तालुक्यात ‘एआय’चा उपयोग समूह शेतीमध्ये केला जाणार आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर जिल्ह्यात ऊस आणि द्राक्ष शेतीत केला जाणार आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष शेतीवर, तर मिरज व वाळवा तालुक्यात ऊस शेतीवर समूह शेती प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बारामती कृषी विज्ञान केंद्राशी चर्चा केली आहे. जिल्ह्यात समूह शेती प्रकल्प राबवला जाणार असून कृषी विभागाकडून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि वाळवा तालुक्यातील ऊस आणि द्राक्ष शेतीत हा प्रकल्प राबवला जाणार असून समूह शेतीसाठी २५ एकर क्षेत्र आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जात आहेत. शेतकऱ्यांकडून अर्ज आल्यानंतर समूह प्रकल्प स्थापन करुन त्याठिकाणी एआय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
शेती क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल विचारात घेता ‘एआय’चा वापर उत्पादनात वाढ करुन खर्च कमी करणे, वेळेत कीड, रोग नियंत्रण करुन पिकांचे नुकसान थांबवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून त्याची सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि वाळवा तालुक्यातून ही सुरुवात होणार आहे. ‘एआय’चा उपयोग समूह शेतीमध्ये केल्यानंतर त्याचे अनेक फायदे मिळत आहेत. शेतीतील विविध डेटा गोळा करणे, त्याचे विश्लेषण करुन त्याआधारे निर्णय घेता येऊ शकतात. पिकांची वाढ, हवामान, मातीची स्थिती याबद्दल शेतीकामांमध्ये सुधारणा करता येणार आहे.
शेतकऱ्यांना शेतात पिकांना योग्य प्रमाणात खते, पाणी आणि इतर संसाधनांची आवश्यकता ओळखता येते. यामुळे संसाधनांचा अपव्यव कमी होतो आणि उत्पादन वाढते. सिंचनाचे योग्य नियोजन केले जाते. हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मातीच्या स्थितीवर आधारित सिंचनाची आवश्यकता ओळखता येणार आहे. ज्यामुळे पाणी बचत होऊन पिकांची गुणवत्ता वाढणार आहे. शेतकऱ्यांना परंपरागत पद्धतीने काम करण्याऐवजी एआय आधारित रोबोट्स आणि ड्रोन वापरुन पिकांची निगा राखणे, फवारणी करणे, किवा तणनाशकांचा वापर करणे सोपे होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच कामाची अचूकता वाढणार आहे.