पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव कारखाना प्रशासनाला ऊस उपलब्धतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने एकरी ऊस उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान कारखाना कार्यक्षेत्रात राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार बुधवारी (ता. ९) माळेगाव कारखान्याने कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके-बारामती) मदतीने आयोजित केलेल्या एआय तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना प्रशासन साखर, वीज, इथेनॉल, खते निर्मितीमध्ये आजवर उजवे ठरले आहे. परिणामी या कारखाना प्रशासन उच्चांकी ऊसदर देण्यात यशस्वी ठरले आहे. अर्थात, प्रगतीची ही यशस्वी घोडदौड यापुढेही कायम राहण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षण शिबिराला महत्त्व प्राप्त झाले होते.
माळेगावच्या कार्यक्षेत्रात १५ टक्क्यांपेक्षा कमी ठिबक सिंचन प्रणाली आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञान अधिक गतीने वापरणे शक्य होण्यासाठी प्रथम ठिबक प्रणाली बनविण्यासाठी काम करावे लागेल, असे ‘केव्हीके’चे विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) डॉ. विवेक भोईटे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी म्याप मायक्रॉपचे संचालक डॉ. भूषण गोसावी, एआय तज्ज्ञ संतोष जाधव, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी मार्गदर्शन केले. ‘माळेगाव’चे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी देवकाते, अनिल तावरे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, तानाजी देवकाते, दत्तात्रेय येळे, मंगेश जगताप, स्वप्निल जगताप, बन्सीलाल आटोळे, सागर जाधव, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.