मुंबई : साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीची रक्कम ठरलेल्या मुदती देणे बंधनकारक आहे. ती न दिल्यामुळे राज्यातील १५ साखर कारखान्यांना आरआरसीची (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) नोटीस काढली आहे. साखर आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांचा समावेश आहे. याशिवाय अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी २ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. या १५ कारखान्यांकडे २४६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
नोटीस काढल्यानंतरही कारखान्यांनी थकबाकी न जमा केल्यास जिल्हाधिकारी कारखान्यांवर जप्तीची कारवाई करतील. कारखान्यांनी पैसे भरल्यानंतर आयुक्तालयात अर्ज करून कारखान्यांना नोटीस रद्द करून घ्यावी लागेल. नोटीसा दिलेल्या कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर (अक्कलकोट), गोकुळ शुगर्स धोत्री, लोकमंगल अॅग्रो-बिबी दारफळ, लोकमंगल शुगर लि., भिमाशंकर शुगर -पारगाव, जयहिंद शुगर्स – आचेगाव, श्रीसंत दामाजी – मंगळवेढा, सिद्धनाथ शुगर -उत्तर सोलापूर, इंद्रेश्वर शुगर लि., धाराशिव शुगर-सांगोला या कारखान्यांचा समावेश आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील स्वामी समर्थ शुगर – नेवासा आणि श्रीगजानन महाराज शुगर संगमनेर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा साखर कारखाना आणि किसनवीर साखर कारखान्याचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सचिन घायाळ शुगर्स पैठण या कारखान्याचा समावेश आहे.