कोल्हापूर : सरसेनापती घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार ‘एआय’ ऊस तंत्राचे मार्गदर्शन

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्यावतीने शुक्रवारी (11 एप्रिल) सकाळी १० वाजता कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ऊस तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, याकरिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कागलमधील कसबा सांगाव रोडवरील मटकरी हॉलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळ दुध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा होईल. कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. कार्यशाळेत ‘एआय’संबंधी सर्व सेन्सर व वेदर स्टेशनचे प्रात्यक्षिक, शंका समाधानाची संधी दिली जाणार आहे.

कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले की, कार्यशाळेत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शात्रज्ञ डॉ. विवेक भोईटे व डॉ. तुषार जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केलेले व करत असणारे प्रगतशील शेतकरी, प्युअर मी ऑरगॅनिकच्या मुख्य कार्यकारी संचालिका डॉ. शर्मिली माने मार्गदर्शन करणार आहेत. या तंत्रज्ञानाच्या प्राथमिक निष्कर्षात विविध ऊस जातींच्या लागवडीमध्ये एकरी १०० ते १५० टनापर्यंत उत्पादन मिळाले आहे. या तंत्रज्ञानाची सखोल माहिती, ऊस पीक व्यवस्थापनासाठी वापर कसा कराल, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या पत्रकार परिषदेला कारखान्याचे सरव्यवस्थापक संजय घाटगे, मुख्य शेती अधिकारी गोकुळ मगदूम व ऊस विकास अधिकारी उत्तम परीट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here