अहिल्यानगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न लढविण्याचा निर्णय महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे आता निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी (ता. ९) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यादिवशी आमदार अमोल खताळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यंदाची संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून तसे पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. त्यामुळे आता कारखान्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून पुन्हा जुन्यांना संधी मिळत की नवीन चेहऱ्यांना याची उत्सुकता आहे.
कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गलीच सावधगिरी बाळगली. ते स्वतः लक्ष घालून ते सर्वत्र फिरत होते. काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री थोरात यांचा पराभव झाला आणि अमोल खताळ आमदार म्हणून निवडून आले. हा पराभव थोरात यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. पराभवानंतर थोरात यांनी गावोगावी जाऊन पुन्हा नव्या उमेदीने कामाला सुरुवात जनतेच्या गाठीभेटी घेतल्या. दुसरीकडे कारखान्याच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनीही कारखाना निवडणूक लढविण्याचे ठरवले होते. या अनुषंगाने आमदार खताळ यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली होती. मात्र, आता त्यांनी निर्णय बदलला आहे. यामुळे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.