नवी दिल्ली : भारताने चालू आर्थिक वर्षात आठ एप्रिलपर्यंत २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केली आहे. आगामी काळातही भारतातून साखरेची निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीत झालेल्या निर्यातीमध्ये सर्वाधिक ५१,५९६ टन साखर सोमालियाला पाठवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
साखर व्यापार संघाच्या सुत्रांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याचा परिणाम साखरेच्या किमतींवर दिसून यावा, कारण इथेनॉल हे वाहतूक इंधनात एक प्रमुख घटक आहे. सद्यस्थितीत साखर निर्यातीला पोषक स्थिती दिसून येत आहे. भारताने सोमालियापाठोपाठ अफगाणिस्तान ४८ हजार ८६४ टन इतकी साखर निर्यात केली आहे. श्रीलंकेला ४६ हजार ७५७ टन, लिबियाला ३० हजार ७२९ टन, जिबुती या देशाला २७ हजार ६४ टन, संयुक्त अरब अमिरातीला २१ हजार ८२४ टन आणि टांझानियाला २१ हजार १४१ टन साखर पाठवली आहे. बांगलादेशला ५ हजार ८८९ टन आणि चीनला सर्वात कमी ५ हजार ४२७ टन साखर निर्यात करण्यात आली आहे.