अहिल्यानगर : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सरकारी साखर कारखान्याच्या ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कारखाना व संलग्न संस्थांच्या जमिनी विक्रीचा विषय गाजणार आहे. कारखान्याची निवडणूक ३१ मेपूर्वी पार पडणार आहे. तर कारखान्याशी संलग्न संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीची राहुरी शहरातील ३१ गुंठे जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. राहुरी तहसील कार्यालयात ११ मे रोजी सकाळी ११ वाजता लिलाव होणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अवमान याचिकेनुसार जप्त केलेल्या राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रगती विद्यालयाच्या समोरील ३१ गुंठे जमिनीचा लिलाव होणार आहे. तहसीलदार नामदेव पाटील यांनी याची नोटीस जारी केली आहे. या जमिनीची सरकारी किंमत दोन कोटी रुपये आहे. लिलावामध्ये तेथूनच बोली सुरू होईल.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ३१ मे पूर्वी होणार आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ११ मे रोजी जमिनीचा लिलाव होणार आहे. यापूर्वीही कारखान्याच्या संलग्न संस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचा लिलाव झाला आहे. कारखान्याचे देणे ५०० कोटींवर आहे. मालमत्तांच्या विक्रीतून देणे कमी होत नसल्याने मालमत्ता लिलावाद्वारे विक्रीस सभासद शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे याविरोधात राजकीय वातावरण तापणार आहे. तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ म्हणाले की, नवीन संचालक मंडळाला याचिकाकर्ते यांची देणी देण्याची संधी द्यावी, जेणेकरून संस्थेची मालमत्ता विक्री होणार नाही. त्यासाठी जमीन विक्री प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी विनंती उच्च न्यायालयास करणार आहे. दरम्यान, राहुरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष युवराज तनपुरे यांनी कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहावे, अशी मागणी कार्यकत्यांनी केली आहे.