सांगली – राजारामबापू कारखाना ऊस शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार : अध्यक्ष प्रतीक पाटील

सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादनात एकरी वाढ होण्यासाठी एआय तंत्रज्ञान, ड्रोनद्वारे औषध फवारणीसाठी प्रयत्नशील आहोत. कारखान्याच्या सर्व गोदामांवर चार कोटींचा खर्च करून १ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच पूर्ण करीत आहोत. सहकारातला हा पहिलाच मोठा प्रकल्प असेल असे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी सांगितले. ऊस उत्पादकांना कार्बन क्रेडिटचा लाभ कसा देता येईल, यासाठी आमचे पथदर्शी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतीच्या माध्यमातून हरित क्षेत्र टिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही ते देण्यासाठी प्रयत्न करू. हा पथदर्शी प्रयत्न असेल असे ते म्हणाले.

अध्यक्ष पाटील म्हणाले की, राजारामबापू साखर कारखान्यांतर्गत सध्याचा साखर साठा १४ लाख ३७ हजार क्विंटल आहे. दीड लाख लिटर क्षमतेच्या डिस्टिलरी-इथेनॉल निर्मितीतून तीन ऑइल कंपन्यांना वितरण केले जाते. गतवर्षी दीड कोटी लिटर इथेनॉल विक्री करण्यात आली असून इंडोमेन्ट ट्रस्टच्या शिक्षण व आरोग्यासाठी कोट्यवधींची मदत कारखान्याने केली आहे. कारखाना सध्या सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या सहकार्याने गाताडवाडी व बोरगाव येथे सामुदायिकपणे योजना राबवत आहोत. ड्रोनद्वारे औषध फवारणी आम्ही सर्वप्रथम सुरू केली. सध्या सुमारे ३० हजार एकरांवर अशी फवारणी होत आहे. पीक सर्वेक्षणासाठी मल्टिस्पेक्ट्रम ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे.

दरम्यान, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर आणि विस्तारासाठी वसंतदादा शुगर टेकच्या माध्यमातून टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याच्या अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड झाली आहे. आमच्या सर्व सभासदांसाठी ते अभिमानस्पद आहे. या तंत्राचा वापर करून लाभक्षेत्रात प्रतिएकरी उत्पादन वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. पुढील गळीत हंगाम १०० दिवसाहून अधिक असावा हे नजीकचे उद्दिष्ट असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here