नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरीय द्विध्रुविता (आयओडी) स्थितीही निष्क्रिय आहे. पावसाळ्यात ती सक्रीय होण्याची स्थिती नाही. त्यामुळे देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे.
देशात १९७१ ते २०२० च्या तुलनेत सरासरी ८७ सेमी पाऊस पडतो. त्यात पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडू वगळता देशाच्या अन्य भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी उपस्थित होते.
प्रशांत महासागरातील ला निना स्थिती नैऋत्य मोसमी पावसाला पोषक असते. ला निना सक्रीय असताना सामान्यपणे भारतीय उपखंडात सरासरी इतका किंवा काहीसा जास्त पाऊस पडतो. एल निनो स्थिती प्रतिकूल असते. एल निनो सक्रीय असताना सामान्यपणे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. यंदा प्रशांत महासागरात निष्क्रीय स्थिती असणार आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहील किंवा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज बांधला जात आहे. हिंदी महासागर द्विध्रुविता ही तटस्थ राहणार आहे. ही तटस्था मोसमी पावसाच्या पथ्यावर पडणार आहे.