सांगली : क्रांती कारखान्यातर्फे ऊस उत्पादनात वाढीसाठी विविध नवनवीन प्रयोग केले जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून ऊस शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी क्रांती साखर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जवळपास १२ ऊस उत्पादकांच्या शेतीवर प्रयोग सुरू आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड, आमदार अरुण लाड यांच्या अथक परिश्रमातून क्रांती साखर कारखान्याची उभारणी झाली आहे. शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती, केवळ हाच उद्देश ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी उत्पादन वाढत असून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा सतत प्रयत्न आहे. कार्यक्षेत्रातील उसाचे हेक्टरी उत्पादन घटून १०४ टन आलेले आहे. कारखान्याचे यावेळी १३ लाख टनाचे उद्दिष्ट असताना गतवर्षीपेक्षा एक लाख टनाने ऊस गाळप कमी झाल्याने स्थिर खर्च आहे. उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करत ऊस उत्पादकांना ३२०० रुपये प्रतिटन ऊस बिल अदा केले आहे. एकूण ११८ दिवसांच्या गाळप हंगामात कारखान्याने ९ लाख ९९ हजार २९०.६१३ टन जिल्ह्यात उच्चांकी ऊस गाळप करून १० लाख ८५ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कारखान्याने बारामती कृषिविज्ञान केंद्राच्या माध्यमातून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून गुणवत्तेच्या आधारे कारखान्यास देशातील ऊस विकास व संवर्धनाकरिता नुकताच पुरस्कार घोषित झाला आहे.