कोल्हापूर : पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने देशातील सहकारी व खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमधील को-जनरेशन प्लँटच्या कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘नॅशनल को-जनरेशन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. कारखान्याचे को-जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना ‘बेस्ट को जन मॅनेजर’ म्हणून गौरविण्यात आले. माजी कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला.
कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल मानाचा प्रथम क्रमांकाचा देश पातळीवरील हा पुरस्कार मिळाला. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यान पंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, को-जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश यांसह विविध राज्यांतील खासगी, सहकारी साखर कारखान्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. खासदार शरद पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. जयप्रकाश साळुंखे- दांडेगावकर यांनी स्वागत केले. डॉ. संगीता कस्तुरे यांनी प्रास्ताविक केले.