अहिल्यानगर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी वीजनिर्मितीबद्दल सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुणे येथे नॅशनल को जनरेशन फेडरेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी स्वीकारला. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, प्रतापराव पवार, राजेंद्र नागवडे, विवेक कोल्हे, थोरात कारखान्यातर्फे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, नवनाथ गडाख, संजय पाटील, अशोक मुटकुळे, भारत देशमुख, भाऊसाहेब खर्डे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने शेतकरी सभासद यांचा विश्वास जपताना प्रतिकूल परिस्थितीतही विक्रमी गाळप करत कायम उच्चांकी भाव दिला आहे. कारखान्याने यावर्षी आठ लाख २५ हजार ९९४ मेट्रिक टनाचे गाळत केले असून, सरासरी साखर उतारा ११.५० राखला आहे. याचबरोबर सात कोटी ८९ लाख युनिट वीजनिर्मिती केली आहे. कारखान्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नॅशनल को जनरेशन फेडरेशनतर्फे दुसऱ्या वर्षीही थोरात कारखान्याला सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले.