कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई साखर कारखाना अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक मुकुंदराव देसाई यांची निवड निश्चित असल्याचे मानले जाते. मंगळवारी (दि. २२) कारखाना कार्यस्थळावर दुपारी एक वाजता साखर सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली बंद पत्रातून निवड केली जाणार आहे.
शनिवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांनी संचालकांची मुलाखत घेतली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सर्व संचालकांना कोण इच्छुक असल्याचे विचारल्यानंतर देसाई व माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी आपण दोघे इच्छुक असल्याचे सांगितले. यानंतर मुश्रीफ व पाटील यांनी स्वतंत्र मुलाखत घेतली.
कारखान्याची निवडणूक होऊन सुमारे दीड वर्षाचा काळ लोटला. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी मंत्री मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सत्ता मिळवली. मुश्रीफ यांचे समर्थक वसंतराव धुरे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. परंतु त्यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अनुभवी संचालक म्हणून जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.