अहिल्यानगर : डॉ. तनपुरे कारखान्याची निवडणूक जाहीर, ३१ मे रोजी होणार मतदान, १ जूनला मतमोजणी

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील बंद पडलेल्या डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून जाहीर झाली. कारखान्यासाठी ३१ मे रोजी मतदान होणार असून, १ जून रोजी मतमोजणी होईल. आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी अनेक राजकीय नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. प्रांताधिकारी किरण सावंत हे निवडणूक अधिकारी असून व सहायक अधिकारी म्हणून तहसीलदार नामदेव पाटील काम पाहातील.

तनपुरे कारखाना बंद पडला आहे. संलग्न संस्थांची अवस्था बिकट बनली आहे. तरीही संचालकपद मिळवण्यासाठी अनेकांनी चाचपणी सुरू केली आहे. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये २१ हजार ८६ सभासदांची यादी आहे. सेवा संस्थांनी दिलेल्या व वर्ग प्रतिनिधींची संख्या १९० इतकी आहे. संबंधित मतदारांच्या मताधिक्यातून वेगवेगळ्या गटातून २१ संचालक निवडले जाणार आहे. तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, २२ ते २८ मेपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज स्वीकारण्यासाठी राहुरी महसूल कार्यालयातील जुन्या ‘सेतू’मध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. २९ मे रोजी अर्ज छाननी होईल. २ ते १६ मेस दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १९ मे रोजी वैध उमेदवारांना चिन्हवाटप होईल. ३१ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जून रोजी मतमोजणी व निकाल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here