पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे उसाला ३० टक्के खत आणि पाणी कमी लागणार असून, जमिनीचा पोत देखील कायम राहणार आहे. तर उत्पादनात चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला होणार आहे. उसाबरोबर आणखी पाच पिकांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. मंगळवारी (ता. २२) ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, आमचा रस शेतीत असून, शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही होतो. त्याची सुरुवात उसापासून तरी झाली असून, या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये औत्सुक्य आहे. आणखी पाच पिकांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सध्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांना काळजीपूर्वक वापर आणि नियोजन करण्याची गरज आहे.